Tuesday, 6 May 2014

मधुमेह आणि आरोग्य विमा


विमा हे जोखीम संरक्षणासाठी उपलब्ध असलेले प्रभावी अस्त्र आहे. आयुर्विमा भारतामध्ये बऱ्याच दशकांपासून असल्याने त्याबद्दल बरीच माहिती मिळते. किंतु मागच्या काही वर्षात आरोग्य विमा क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे आणि त्याबद्दल जागरुकता हळू-हळू वाढू लागली आहे. आरोग्य विमा ही आता एक आवश्यक गरज म्हणून लौकिकात येत आहे. हॉस्पिटलचा खर्च, उपचारांचा खर्च, डॉक्टरांची फी आणि इतर वैद्यकीय खर्च हे प्रत्येक कुटुंबासाठी एक आर्थिक आव्हान उभे करते. आरोग्य विम्याच्या योजनांद्वारे जोखीम संरक्षण करून ह्या संकटाला सामोरे जाण्याची आर्थिक ताकद निर्माण करणे, ही काळाची गरज आहे.

भारतात आरोग्य विमा पेक्षा ‘मेडिक्लेम’ हा शब्द अधिक प्रचलित आहे कारण पूर्वीपासून राष्ट्रीयकृत साधारण विमा कंपन्या ह्याच  नावाने हॉस्पिटलच्या खर्चाची भरपाई करणाऱ्या योजना राबवत आहेत. ‘मेडिक्लेम’ हा खरा तर त्यांचा ब्रांड-नेम आहे. विमा क्षेत्र, निजी कंपन्यांसाठी खुले झाल्यानंतर ‘आरोग्य विमा’ हा शब्द वापरणे इष्ट ठरते. आरोग्य विमा हा आरोग्यासंबंधी कुठल्याही विम्यासाठी उपयुक्त असा शब्द आहे. आरोग्य विम्याचे क्षेत्र अधिक व्यापक आहे. हॉस्पिटल खर्चाच्या भरपाई योजने व्यतिरिक्त क्रिटीकल इलनेस, सर्जिकल बेनिफिट, कार्डीयाक-केअर, कॅन्सर-केअर इत्यादी योजना आरोग्य विम्याच्या क्षेत्रात येतात.

आय.आर.डी.ए. अर्थात इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या नियमानुसार, आरोग्य विमा घेतांना असलेले आजार, किमान प्रथम तीन ते चार वर्ष, आरोग्य विम्यामध्ये कव्हर होत नाहीत. अर्थात् आरोग्य विमा घेत असतांना पूर्व विद्यमान आजार (Pre-existing Diseases) आणि त्यांच्याशी निगडीत हॉस्पिटल खर्च विम्यात ठराविक काळ समाविष्ट केला जात नाही. विशेषतः मधुमेहा सारखा आजार आधीच झालेला असल्यास, आरोग्य विमा योजनांमध्ये संरक्षण मिळवणे अवघड बाब होती आणि तीन ते चार वर्ष प्रतीक्षा केल्या शिवाय संरक्षण मिळत नव्हते. अश्या व्यक्तींना नियोक्ता किंवा इतर संस्थांद्वारे प्रदत्त समूह विमा योजनेवर अवलंबून रहावे लागायचे. परंतु आता मधुमेह झालेल्या लोकांसाठी विशेष आरोग्य विमा योजना नुकत्याच उपलब्ध झाल्या आहेत. ह्या योजनांची वैशिष्ट्ये जाणून, आपल्यासाठी त्या योग्य आहेत किंवा नाहीत, हे माहित करुन घेणे गरजेचे आहे. 

मधुमेह झालेल्या व्यक्तींना व्यापक कव्हरेज मिळावे ह्या दृष्टीकोनातून स्टार हेल्थ & अलाइड इन्शुरन्स तर्फे सुधारित ‘डायबेटीस सेफ’ ही योजना मार्च २०१४ पासून सुरु झाली आहे. टाइप १ किंवा टाइप २, दोन्ही प्रकारांपैकी कुठलाही मधुमेह झालेल्या व्यक्तीसाठी ही योजना उपयुक्त आहे. १८ ते ६५ वर्ष वय असलेले व्यक्ति योजनेत सामील होण्यास पात्र आहेत. ६५ वर्ष वयाच्या आधी योजनेत सहभागी झालेले सर्व व्यक्ति आयुष्यभर नूतनीकरण करण्यास पात्र आहेत. तसेच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी ‘फेमिली- फ्लोटर’ पर्याय देखील आहे. ‘डायबेटीस सेफ’ ह्या योजनेत सामील होण्यासाठी कंपनीतर्फे ‘प्लान ए’ आणि ‘प्लान बी’ अंतर्गत भिन्न नियमावली केलेली आहे. 

‘प्लान ए’ मध्ये वैद्यकीय तपासणी नंतरच योजनेत प्रवेश दिला जातो. त्यामुळे ‘प्लान ए’ मध्ये पहिल्या दिवसापासूनच मधुमेहाशी संबंधित आजारांचे जोखीम संरक्षण सुरु होते, हे विशेष. मधुमेहा व्यतिरिक्त जर इतर काही पूर्व विद्यमान आजार योजनेत समाविष्ट होत असतांना असले तर त्यांचे जोखीम मात्र ४८ महिन्याचा प्रतीक्षा काळ संपल्यानंतरच सुरु होते. वैद्यकीय तपासणी मुळे विमा कंपनीलाही विमा घेणाऱ्या व्यक्तीच्या तब्येतीबद्दल नेमका आढावा घेता येतो. 

‘प्लान बी’ मध्ये वैद्यकीय तपासणी न करता थेट प्रवेश दिला जातो. त्यामुळे मधुमेहाशी संबंधित सर्व आजारांचे संरक्षण लगेच सुरु होत नाही. योजनेत समाविष्ट झाल्या नंतर ३१व्या दिवसापासून Cardio-vascular, Renal, Eye, Foot ulcer व्यतिरिक्त मधुमेहाशी निगडीत सर्व व्याधींचे संरक्षण सुरु होते. Cardio-vascular, Renal, Eye, Foot ulcer संबंधित व्याधींचे संरक्षण १६व्या महिन्यातच सुरु होते. इतर पूर्व विद्यमान आजारांचा नियम ‘प्लान ए’ प्रमाणेच आहे. 

अपोलो म्युनिख हेल्थ इन्शुरन्स तर्फे मधुमेह झालेल्या व्यक्तींसाठी ‘एनर्जी’ योजना डिसेंबर २०१३ पासून सुरु झालेली आहे. ‘एनर्जी’ फक्त टाईप २ मधुमेह असणाऱ्या व्यक्ति साठी आहे. टाईप १ डायबेटीक कव्हर नसले तरी       Pre-Diabetes (Impaired Fasting Glucose/Impaired Glucose Tolerance) आणि उच्च रक्तदाब असलेले व्यक्ति ‘एनर्जी’ मध्ये सहभागी होऊ शकतात. १८ ते ६५ वर्ष वय असलेले व्यक्ति योजनेत सामील होण्यास पात्र आहेत. तसेच ह्या योजनेत ही ६५ वर्ष वयाच्या आधी योजनेत सहभागी झालेले सर्व व्यक्ति आयुष्यभर नूतनीकरण करण्यास पात्र आहेत. योजनेत सहभागी झाल्यानंतर प्रथम दिवसापासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे झालेल्या रुग्णालयातील खर्चाचे कव्हरेज मिळते. ह्या व्यतिरिक्त योजनेत समाविष्ट होत असतांना जर इतर काही पूर्व विद्यमान आजार असले तर त्यांचे जोखीम मात्र ३६ महिन्यानंतरच सुरु होते.

‘एनर्जी’ योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे वेलनेस-प्रोग्राम. वेलनेस बेनिफिटची पात्रता मिळण्यासाठी, योजनेत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक वर्षी दोन वैद्यकीय तपासण्या करणें आवश्यक आहे. वेलनेस टेस्ट १ आणि वेलनेस टेस्ट २ मध्ये कुठल्या चाचण्या करायच्या आहेत हे योजनेत स्पष्ट केले गेले आहे. टेस्ट साठी जर योजनेत सामील व्यक्ति स्वतः खर्च करणार असला तर त्यानी ‘सिल्वर प्लान’ निवडावा अन्यथा ‘गोल्ड प्लान’ घेऊन टेस्ट साठी लागणारे पैसे अपोलो म्युनिख कडून भरपाई करुन घ्यावेत. चाचणीत आलेल्या निष्कर्षांच्या आधारे चांगले स्वास्थ्य ठेवल्यास बक्षिस गुण दिले जातील. ह्या बक्षिस गुणांच्या मोबदल्यात नूतनीकरण्याच्या वेळेस प्रिमियम (हप्ता) वर  २५% पर्यंत सूट आणि २५% पर्यंत वैद्यकीय खर्चाची भरपाई देण्यात येईल. 

‘वेलनेस-सपोर्ट’ द्वारा योजनेत समाविष्ट व्यक्तीला वेलनेस संकेतस्थळाचा प्रवेश, वैद्यकीय नोंदणीसाठी जागा आणि स्वास्थ्य उत्पादनांवर विशेष सवलत दिली जाईल. शिवाय व्यक्तिगत स्वास्थ्य प्रशिक्षक आहार आणि फिटनेस संबंधी  संपूर्ण योजना तयार करुन देईल. प्रत्येक महिन्याला वार्तापत्रा द्वारे माहिती आणि रोज हेल्पलाईनचा ही आधार असेल.
‘एनर्जी’ योजनेत २०% ‘को-पेमेंट’ करण्याची ऐच्छिक सुविधा आहे. सहभागी होणारा व्यक्ति स्वेच्छेने प्रत्येक दाव्याचा २०% खर्च स्वतः वहन करू शकतो आणि उरलेले ८०% कंपनी कडून भरपाई म्हणून घेऊ शकतो. असे केल्याने दरवर्षी प्रिमियम बऱ्यापैकी कमी होऊ शकते.

अपोलो म्युनिख ‘एनर्जी’ योजनेत हॉस्पिटल मधील खोलीच्या भाड्यावर कुठल्याही मर्यादा नाहीत ही जमेची बाजू. तसेच Cataract आणि Cardio Vascular System च्या संबंधी खर्चांवर कुठलीही मर्यादा नाही. स्टार च्या सुधारित ‘डायबेटीस सेफ’ योजनेत मधुमेहाच्या कारणाने हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यास Single Standard A/C Room चे भाडेच क्लेम केले जाऊ शकते. तसेच इतर आजारांमुळे हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यास विमा संरक्षणाच्या एकूण राशिच्या १.५% किंवा कमाल रुपये ८,५०० प्रति दिवस, अशी दाव्याची मर्यादा आहे. ‘डायबेटीस सेफ’ योजनेत Cataract आणि Cardio Vascular System च्या संबंधी खर्चांवरही मर्यादा आहे.

स्टार च्या सुधारित ‘डायबेटीस सेफ’ योजनेत ४०४ डे-केअर उपचार सम्मिलित आहेत. अपोलो म्युनिख ‘एनर्जी’ योजनेत १४४ डे-केअर उपचार सम्मिलित आहेत. ‘डायबेटीस सेफ’ योजनेत वैद्यकीय तपासणी न करता योजनेत सहभागी होण्याचा मार्ग खुला आहे. ‘एनर्जी’ योजनेत वैद्यकीय तपासणी शिवाय योजनेत सहभागी होता येत नाही.

‘डायबेटीस सेफ’ योजनेत विमा राशिच्या १००% पर्यंत Automatic Restoration Benefit उपलब्ध आहे. उदाहरणार्थ एका पॉलिसी वर्षात जर कधी संपूर्ण संरक्षित रकमेचा दावा झाला आणि त्याच वर्षात दुसऱ्या आजाराने पुन्हा दावा करण्याची वेळ आली, तर स्टार हेल्थ विमा संरक्षण रकमेच्या आणखी १००% पर्यंत दावा मंजूर करेल. 

स्टारच्या सुधारित ‘डायबेटीस सेफ’ योजनेचे प्रतिवर्ष प्रिमियम अपोलो म्युनिख ‘एनर्जी’ योजनेच्या प्रिमियम पेक्षा कमी आहे, ही स्टारची सर्वात जमेची बाजू. ३६ ते ४० वयोगटात तीन लाख विमा रकमेच्या वार्षिक प्रिमियमचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर ‘डायबेटीस सेफ’ च्या ‘प्लान ए’ चे प्रिमियम आहे रु. ९,७६५ आणि ‘प्लान बी’ चे प्रिमियम आहे रु. १३,१९०. ‘एनर्जी’ योजनेच्या ‘सिल्वर प्लान’ चे को-पेमेंट विना प्रिमियम आहे रु. ११,७०७, तर ‘गोल्ड प्लान’ चे प्रिमियम रु. १६,४१३ आहे.

इथे हे जाणून घेणे ही आवश्यक आहे कि आरोग्य विमा कंपन्या Underwriting norms च्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीची जोखीम स्वीकारायची की नाही, हा निर्णय स्वतः कडे राखून ठेवतात. जोखीम जास्त वाटल्यास ते अधिक प्रिमियम आकारु शकतात किंवा जोखीम नाकारू शकतात. 

आरोग्य विमा योजनांच्या अटी, त्यात समाविष्ट असलेले किंवा नसलेले आजार, प्रतीक्षा काळ, दाव्याच्या रकमेच्या मर्यादा किंवा उप-मर्यादा ह्या सर्व गोष्टींचा योग्य विचार केला गेला पाहिजे किंवा सल्लागाराला तत्संबंधी विचारपूस केली गेली पाहिजे.

आपल्या जीवनाचा टप्पा, आपली उद्दिष्टे, आपले आर्थिक नियोजन आणि आपल्यावर आश्रित कुटुंबियांचा विचार करुन आरोग्य विमा जरुर घ्यावा. अन्यथा आपल्या महत्वाच्या उद्दिष्टांसाठी बचत करुन ठेवलेले पैसे उपचारासाठी वापरण्यात येतात आणि उद्दिष्टांना पुढे ढकलावे लागते. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची वैयक्तिक आरोग्य विमा योजना घ्यावी आणि निव्वळ नियोक्ता द्वारा प्रदत्त समूह विमा योजनांमध्ये सहभागी असून समाधान मानू नये. निवृत्ती नंतर किंवा स्वतः स्वतंत्र व्यावसायिक झाल्यास आरोग्य विमा योजना अपरिहार्य आहेत आणि त्याचे कव्हरेज व्यापक असावे, ही जाणीव सतत ठेवली पाहिजे. 

मधुमेह झालेल्या लोकांसाठी ह्या दोन्ही योजना तात्काळ किंवा अत्यल्प प्रतीक्षा काळात हॉस्पिटल खर्चापासून संरक्षण करतात आणि म्हणूनच त्यांचा विचार करणे महत्वाचे आहे. आरोग्याशी संबंधित जोखीम विमा कंपनीकडे सोपवून आर्थिकदृष्ट्या ‘स्ट्रेस-फ्री’ व्हायचे की जोखीम स्वतः कडे ठेवून उद्दिष्टांना ढकलत ‘स्ट्रेस-फुल’ राहायचे, ही निवड योग्य वेळ निघून जायच्या आधी करावी. 


(Published in 'Madhumeh' May 2014)

No comments:

Post a Comment