‘व्हेलेन्टाईन्स डे’
म्हणजे प्रेमाचे प्रतीक. एकमेकात गुंतलेल्या प्रेमी जोडप्यांनी, प्रेमाची उदार आणि
उबदार अभिव्यक्ती करायचा दिवस. इतक्या रोमेंटीक दिवशी गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाचा
विचार तरी कशाला? एक इतका रूचकर आणि दुसरा इतका रूक्ष विषय असून त्यांच्यात उगाच
धागे-दोरे शोधून काढण्याचा हा उपद्व्याप कां ?
उत्तर सोपे आहे. एकमेकात
गुंतलेल्या प्रेमी युगुलाचा हा दिवस. म्हणजे गुंतवणूक ही आलीच की, भावनांची आणि
आर्थिक देखील. फक्त भावना प्रधान आर्थिक गुंतवणूक नको. ‘लाइफ प्लानिंग’ किंवा
‘लाइफ स्टाईल प्लानिंग’ म्हणजे कसे आणि कुठल्या जीवन शैलीला अनुसरून जगायचे, हे
ठरवण्याचे नियोजन. आपली रोजची जीवन शैली ही आपल्याला आवश्यक वाटणाऱ्या काही
गोष्टींच्या असण्या किंवा नसण्या मुळे निश्चित होते. आर्थिक सबलता असल्यास
निश्चितच जीवन शैली उंचावत जाते. फायनान्शियल प्लानिंग अर्थात आर्थिक नियोजन,
आर्थिक सबलतेला आपल्या जीवनातील उद्दिष्टे आणि आकांक्षांच्या बरोबर जोडते. म्हणूनच
आर्थिक नियोजन हे प्रत्येक जोडप्याच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे.
कॉलेज मध्ये जाणाऱ्या
मुला-मुलींना जेव्हा ‘व्हेलेन्टाईन्स डे’ चे वेध लागतात, तेव्हा पॉकेट-मनी चा मोठा
भाग साजरा करण्यात जाणार हे नक्की, नुसतं दांडी असलेले गुलाबाचं फूल देखील कसलं
भाव खाऊन जाते. योजून खर्च करणारे हुशार ठरतात, बाकी दोन महिन्याची पॉकेट-मनी
गमावून बसतात. हौसेला मोल नाही, ठीक आहे पण तोल तरी असावा. ह्या वेळेस
विद्यार्थ्यांना किमान एवढे समजणे गरजेचे आहे कि स्वप्नातील विश्व साकारण्यासाठी
करीअर आणि आर्थिक नियोजन टाळण्यासारखे नाही.
असं म्हणतात कि प्रेम
आंधळे असते. परंतु डोळ्या वरची पट्टी काढून लग्न ठरलेल्या जोडप्यांनी एकमेकांच्या
आर्थिक बाजूची चाहुल घेणे आवश्यक आहे. लग्ना नंतर दोन व्यक्तींच्या संपत्ती आणि
दायित्व ह्यांचे ही विलीनीकरण होते. पुढे ह्या आर्थिक बाबी संतुलित वैवाहिक जीवन
जगण्यासाठी महत्वाच्या असतात. आर्थिक परिपक्वता असणे ही नेहमीच जमेची बाजू.
म्हणूनच एकमेकांचे आर्थिक व्यक्तिमत्व माहित असणे हितावह.
तसेच लग्नानंतर
दोघांच्या जीवनातील ध्येय, उद्दिष्टे आणि आकांक्षा एकमेकांशी सविस्तर बोलूनच
निश्चित करायला हव्यात. त्याच बरोबर उद्दिष्टे आणि आकांक्षा आर्थिक दृष्ट्या
समतोल आहेत किंवा नाही आणि ते गाठण्यासाठी किती जोखीम स्वीकारणे गरजेचे आहे हे
जाणून घेतले पाहिजे. जोखीम संरक्षण करण्यासाठी योग्य उपाय करण्याची वेळ पण हीच.
‘मला त्यातले काही कळत नाही’ असे टाळून दोघांचे नुकसान करून घेऊ नका. पर्सनल फायनान्स
हा खाजगी विषय आहे म्हणून कुणाशी न बोलता किंवा जास्त विचार न करता तडका-फडकी
निर्णय घेऊ नका. मार्गदर्शन करायला योग्य सल्लागार निवडा.
कुटुंब असल्यास तर वरील
विचार आणि आर्थिक नियोजन ही अधिक गरजेची गोष्ट आहे. महत्वाची उद्दिष्टे साध्य
करण्याची वेळ जवळ येत असते. नियोजन केले नसल्यास त्याची उणीव सगळ्यात जास्त ह्या
वेळी जाणवायला पाहिजे. कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या एकत्रित आणि व्यक्तिगत उद्दिष्टांना
योग्य महत्व देऊन, त्यांचा अग्रक्रम लावणे हे आव्हानात्मक कार्य आहे. मुलांचे
शिक्षण हे साहजिकच जास्त महत्वाचे वाटते परंतु जोडप्याने आपल्या उद्दिष्टांचा उगाच
बळी देऊ नये. काही मधला मार्ग निघतो का हे जरूर तपासावे. कुटुंबात ह्यासाठी परस्पर
प्रेम, विश्वास, आदर आणि वात्सल्याचा धागा असणे अत्यावश्यक आहे.
धकाधकीचे जीवन
जगल्यानंतर, सेवा निवृत्तिच्या पुढे खरं तर जीवन साथी वर प्रेमाचा पूर्ण फोकस
करण्याची शक्यता अधिक. एका मराठी कविवर्यांनी निवृत्तिला ‘जगण्याची नवी आवृत्ती’
अशी उपमा दिली आहे. आपल्या राहून गेलेले उद्दिष्टे व आकांक्षा पूर्ण करण्याची ही
एक संधि आहे. प्रश्न येतो तो पुन्हा हाच कि हे सगळे आर्थिक दृष्ट्या सुसाध्य आहे
का ? माणसाच्या आयुष्याचा काळ वाढत चालला आहे. तेव्हा निवृत्तिच्या वेळी साठवलेलं
धन उर्वरित आयुष्य जगण्यासाठी पुरे सं आहे का ?
जीवनातील वेगवेगळ्या
टप्प्यांवर प्रेम आणि आर्थिक स्थिती गुरफटलेली आहे. ह्या गुरफटण्याचा गुंता होता
कामा नये. म्हणूनच स्वत:चे आर्थिक धोरण
लौकर आखणे, आर्थिक नियोजनाचा प्रक्रम अनुसरणे, त्याची अंमल बजावणी चोख रित्या करणे
आणि प्रत्येक वर्षी आर्थिक नियोजनाचा आढावा घेणे, ही प्रेमाची ‘लॉंन्ग-टर्म’
गुंतवणूक केल्या सारखे आहे.
अन्यथा आयुष्यावर बरेच
काही बोलणारे कवी संदीप खरे यांनी लिहिल्या प्रमाणे अवस्था होते-
“मी
वजा जमेतून होतो, अन् जमा वजेस्तव होतो,
हे
गणित समजले तेंव्हा, आयुष्य निवळले होते.”